Apurv Bangal | अपूर्व बंगाल

Apurv Bangal | अपूर्व बंगाल
वंगभूमीचे कलासंचित तिथल्या साहित्यिक-कलावंतांच्या कामगिरीतून उठावदार होत आले आहे. बंगाली भाषेतील कथा-कादंबऱ्या व काव्य आणि बंगाली संस्कृतीतून रुजून आलेली चित्रपटांची संस्कृती या साऱ्याच गोष्टी बंगालबाहेरही आपला प्रभाव टाकत आल्या आहेत. पारंपरिकतेतील अभिजातता आणि आधुनिकतेतील नव्या जगाची ओळख, या दोन्ही बाजूंना न्याय देणारी बंगालची संस्कृती एका समृद्ध कलाजीवनाचा वारसा सांगणारी धारा आहे. बंगालच्या या वैभवाचा वेध घेणारे अपूर्व बंगाल हे नंदिनी आत्मसिद्ध यांचे पुस्तक विविध बंगाली लेखक-कलावंतांच्या योगदानाची आणि बंगाली साहित्य-चित्रपटांची मार्मिक सफर घडवून आणते. रवीन्द्रनाथ, शरदबाबू, विमल मित्र, काझी नझरूल, महाश्र्वेतादेवी, सत्यजित राय, अपर्णा सेन, अन्नपूर्णादेवी, अभिताभ घोष इ. विविध बंगाली व्यक्तिमत्त्वांवरील लेख यात समाविष्ट आहेत. नंदिनी आत्मसिद्ध यांनी बंगाली कलाजीवनाचा घेतलेला रसीला मागोवा वंगभूमीच्या सांस्कृतिक वारशाची ओळख नव्याने करून देणार आहे.