Ashwamedh | अश्वमेध

Ashwamedh | अश्वमेध
साधारण इ. स. १९७५ ते २००० या कालखंडावर त्रिखंडात्मक कादंबरी लिहिण्याच्या रवींद्र शोभणे यांच्या प्रकल्पातील 'अश्वमेध' ही कादंबरी 'पडघम' या त्यांच्या आधीच्या कादंबरीचा पुढील भाग होय. प्रत्यक्षातील कालखंड जेव्हा एखादा लेखक चित्रणासाठी निवडतो तेव्हा त्या कालखंडावर प्रभाव टाकणार्या प्रत्यक्षातील व्यक्ती त्याला टाळता येत नाहीत. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी इत्यादी. त्यांची चित्रणे लेखकाला करावी लागतातच. मात्र ही चित्रणे ललित कलाकृतीमधील निर्मिती असली तरी ती आविष्कृत झाली पाहिजेत याची लेखकाला काळजी घ्यावी लागते. त्याच वेळी वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीचे चित्रण करणार्या अनेक व्यक्ती आपल्या प्रतिभाशक्तीने निर्माण कराव्या लागतात. येथे रवींद्र शोभणे यांनी प्रत्यक्षातील व्यक्तींची प्रभावी पुनर्निर्मिती तर केली आहेच, पण तो कालखंड उभा करण्यासाठी विविध वृत्तीप्रवृत्तींची असंख्य व्यक्तिचित्रेही निर्मिली आहेत. यातून एक कालभान प्रकट होते.