Bedtime Story |बेडटाईम स्टोरी

Bedtime Story |बेडटाईम स्टोरी
सत्तरच्या दशकात भारतात लागू झालेल्या आणीबाणीच्या संवेदनशील काळात किरण नगरकर यांनी लिहिलेले 'बेडटाइम स्टोरी' हे नाटक त्यानंतरच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे ठरले. मात्र सध्याच्या परिस्थितीतही या नाटकाचे कथानक अधिक समर्पक आणि विचार करायला लावणारे आहे असे वाटते. १९७८ साली लिहिलेल्या या नाटकाला रंगभूमीवर येण्यासाठी त्यावेळी अनेक अडथळे पार करावे लागले होते. "ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांनी नाटकाचे वेगळेपण आणि महत्त्व जाणले होते. या नाटकाबद्दल ते लिहितात 'किरण नगरकर यांनी महाभारतातील निरनिराळे प्रसंग घेऊन ते आजच्या अत्याधुनिक विद्रोही तरुण पिढीच्या प्रतिनिधीला कसे दिसतील तसे नाटकात एकापुढे एक मांडले आहेत. त्या काळात विद्रोही दलित साहित्याची जी भाषा रूढ झाली होती ती अत्यंत रांगडी रोखठोक सुसंस्कृत मनाला बीभत्स वाटावी अशी पण आशयाला थेट जाऊन भिडणारी - भाषा संबंध नाटकभर वापरली आणि ती महाभारतातल्या वंदनीय व्यक्तींच्या तोंडी घातली. पण नाटककाराला महाभारतकारांना काही मूलगामी प्रश्न विचारायचे होते आणि त्याने ते बेधडकपणे विचारले. मला नाटक फार आवडले. अत्यंत पाखंडी आणि स्फोटक असे या नाटकाचे थोडक्यात वर्णन करता येईल.'" चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी किरण नगरकर यांनी लिहिलेल्या ह्या नाटकाची मूळ संहिता पुस्तकरूपाने आता प्रथमच प्रकाशित होत आहे. रसिक या नाटकाचे उत्तम स्वागत करतील याची खात्री आहे.