Bharatiya Murtishastra | भारतीय मूर्तिशास्त्र

Bharatiya Murtishastra | भारतीय मूर्तिशास्त्र
मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे? ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणेही नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरूप स्पष्ट करतात. मूर्तिच्या अभ्यासात स्वरूपाचा समावेश होत असतो पण हा मूर्तिच्या अभ्यासाचा एक भाग आहे. मूर्तिशास्त्रात मूर्तिचा अभ्यास हा व्यापक स्वरूपाचा आहे. मूर्तिच्या हातात असणारी आयुधांपैकी किती वास्तविक आयुधे आहेत आणि त्यांचा प्रतीकात्मक अर्थ काय आहे? मूर्तीचे वाहन जे असते त्याचा मूर्तीशी काय संबंध आहे आणि मांगलिक म्हणून ओळखल्या गेलेल्या चिन्हांचा अ काय हे देखीलस्पष्ट करावे लागते. या सर्वांचा मूर्तीशी असणारा संबंध मांडावा लागतो. असा हा सर्व संमिश्र अभ्यास म्हणजे मूर्तीचा अभ्यास होत असतो. मूर्तिशास्त्राची मांडणी करताना या उपरोक्त घटकांसह मूर्तीची वस्त्रे आणि मूर्तीवर असणारे अलंकार याचाही विचार हा अपरिहार्यच असतो. कारण यांच्यात काळानुसारे परिवर्तन झालेले आढळते. मूर्तीवरीलअलंकारात होणारे परिवर्तन हे त्या त्या काळातील आर्थिक स्थितीचे सूचक असते आणि याचा समावेश मूर्तिशास्त्रात होत नसला तरीही तो महत्त्वपूर्णच आहे. "मूर्ती ही कौशल्यात होत असणाऱ्या विकासाचे प्रतिनिधित्व करीत असले तरीही ती संस्कृतीचेही प्रतीक असते. मूर्तिशास्त्राचा अभ्यास हा बहुआयामी अभ्यास आहे तो केवळ पाषाणात कोरलेल्या मूर्तीचा वा आकृतीचा अभ्यास नाही. संबंधित काळाची आर्थिकता सामाजिकता धार्मिक स्थिती आणि राजकीय स्थिती यांचा चार करावाच लागतो. किंबहुना याशिवाय मूर्तिशास्त्राची योग्य मांडणी करता येत नाही. यामुळे मूर्तिशास्त्र हे बहुविध अभ्यासाचे एकत्रित रूप आहे असे म्हणावे लागते."