Bhas 10.25 | भास १०.२५
Bhas 10.25 | भास १०.२५
एकही चुणी न पड्लेल्या काळ्याशार चादरीसारखा समुद्र, एकदाच ढग कपाळावर वागवणारं राखिकबरं आकाश.
फिक्या गोंदणासारखी चांदव्याची बिंदी डौलदार.
पिवळ्या प्रकाशाचं नि बोथट काळोखाचं कॉकटेल झोकून धुंदावलेले रस्ते.
कुठल्याश्या थेटरातून रस्त्यावर सांडलेली गर्दी मूठभर.... बाकी अपरात्रीच्या प्रहारली नखलास शांतता.
असं वाटतं,
कसल्याश्या जहरी डिस्टोपियाला जेमतेमच झाकून घेणारी भूल पडली आहे आसमंतावर.
आणखी एखाद्या अश्राप जीवाला नख लावण्याची तेवढी देर आहे फक्त-वसंतसेनेच्या दागिन्यांसारखा क्षणार्धात निखळून खाली येईल सगळा संभार.
जग नागडं होईल.
पुन्हा सुरुवात,
पहिल्यापासून.
------ मेघना भुस्कुटे