Bibliophile | बिब्लिओफाइल
Bibliophile | बिब्लिओफाइल
"Bibliophile" (बिब्लिओफाइल) हे पुस्तकप्रेमींसाठी वापरले जाणारे इंग्रजी नाव आहे, आणि मराठीत याला 'पुस्तकप्रेमी' किंवा 'ग्रंथवेडा' म्हणतात.
बिब्लिओफाइल गणेश मतकरी यांचे नवं पुस्तक पुस्तकांबद्दलचं असलं, तरी ते केवळ पुस्तकांबद्दल आहे असं नाही. ते वाचनाबद्दलचं आहे, वाचणाऱ्यांबद्दलचं आहे, माझ्याबद्दलचं तर आहेच. कदाचित तुमच्याबद्दलचंही.
पुस्तकं वाचत सुटणं, ती जमवणं, त्यांचे संग्रह करणं हा वेडाचा एक प्रकार आहे. वाचन कमी होत जातंय की काय, पुस्तकं शिल्लक रहाणार की नाही, अशा काळजीयुक्त अफवांकडे फारसं लक्ष न देता नवी जुनी पुस्तकं घेत रहाणं, त्यातलं जमेल तेवढं वाचत रहाणं, ती पुस्तकं कुठे ठेवावीत याची चिंता खरेदीचा वेग कमी न करता करणं यात एक वेगळी मजा असते, जिचा अनुभव मी अनेक वर्ष घेत आलो आहे. माझं वाचन काहीसं बेशिस्त आहे. अमुक एका पद्धतीच्या, अमुक एका साहित्यप्रकारातल्या पुस्तकांपुरतं ते मर्यादीत नाही. काही विषयांना मी अधिक प्रेफरन्स देतो हे खरं आहे, पण त्याबरोबरच आपल्या आवडू शकेल असं इतर काय सापडतं याकडे माझं लक्ष असतं, आणि ते सापडलं, की आपल्यापर्यंत ते कसं येऊ शकेल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु होतो. हे सातत्याने अनेक वर्ष करण्याचा अनुभव या पुस्तकामागे आहे. - गणेश मतकरी