Chitragandh |चित्रगंध

Chitragandh |चित्रगंध
क्रिकेट, सिनेमा हे भारतीय जनमानसाचे वीक पॉइंट आहेत. त्यातही विशेषत: सिनेमाविषयीच्या स्मरणरंजनपर लेखनाला, म्हणजे ६०-७०-८०या दशकातील सिनेमे, नट-नट्या यांच्याविषयीच्या लेखनाला वाचकांकडून अधिक पसंती मिळते. पण हिंदी चित्रपटसृष्टीचे अभ्यासक दिवाकर गंधे यांच्या या पुस्तकातील लेखन हे भारतीय विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मागे जाणारं आहे. त्यामुळे त्यातून तुकडातुकडांतून का होईना भारतीय सिनेमाचा मोठा पैस जाणून घेता येतो. या पुस्तकात दादासाहेब फाळके, सोहराब मोदी, सैगल, प्रकाश पिक्चर्स, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, नौशाद अशा नामवंतांबरोबर मृदुला, खेमचंद, नादिया, सुरैया यांसारख्या काहीशा विस्मृतीत गेलेल्या कलाकारांवरही लेख आहेत. पुस्तकातील एकंदर लेखांची संख्या आहे ४७. प्रत्येक लेख जवळपास पाच ते आठ पानांचा. शिवाय गंधे यांची भाषा रसाळ. त्यामुळे हे लेख पटकन वाचले जातात. छोटाशा लेखातही भरपूर संदर्भ, वेधक माहिती आणि तपशील दिल्यामुळे रंगत येते.