Choukat Udhalale Moti | चौकात उधळलेले मोती

Choukat Udhalale Moti | चौकात उधळलेले मोती
उर्दू.हिरव्या पानांवरचं लोभस नक्षीकाम. वासंतिक वाऱ्याचा सुगंधी श्वास. भारतमातेच्या गळ्यातला मौल्यवान चंद्रहार. एका ऐतिहासिक युगाचा आर्त विलाप. उर्दू..जीवनाचं समग्र, उग्र-मधुर भान. अनेक भाषा-भगिनींच्या मायसावलीत वाढली अन् पाहता पाहता उर्दू शक्तिमान, सुस्वरूप झाली आणि समजूतदारही. तिचा विचारव्यूह व्यापक आणि बहुआयामी होता. एकाच वेळी ती फारसी भाषेशी गुफ्तगू, भारतीय तत्त्वज्ञानाशी विचारविनिमय आणि टोपीकर ब्रिटिशांशी फिरंगी खलबतं करत होती. काय ते पदलालित्य…काय ते समेवर येणं ! मोगल सल्तनतीच्या उदास सांध्य-उन्हात उर्दू उजळून निघाली, भारताच्या लोकगंगेत मिसळून गेली. भले सरंजामी काळात जन्माला आली असेल; पण माणुसकी, बंधुता आणि स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यं तिने अम्लान निष्ठेने जोपासली. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल.