Derda | देर्दा

Derda | देर्दा
सुप्रसिद्ध तुर्की लेखक हकन गुंदे यांच्या या कादंबरीमध्ये देर्दा नावाच्या दोन व्यक्तिरेखा आहेत. दोन वेगवेगळ्या प्रतलांवर जगणारे दोन देर्दा, समवयस्क आणि भिन्नलिंगीय – एक स्त्री आणि एक पुरुष. एक देर्दा, जो कब्रस्तानात, कबरी धुण्याचं काम करत लहानाचा मोठा होत असताना एका क्रांतिकारी तुर्की साहित्यिकाच्या कबरीवर कोरलेली काही अक्षरे, त्याला जगण्याकरता प्रेरणा पुरवत आहेत, परिस्थितीमधून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्याचे प्रोत्साहन त्याच्याही नकळत पुरवत आहेत. आणि मग तो स्वतःही पुस्तकांच्या सहवासात ओढला जातो. पुस्तकाचे हे जग पायरेटेड प्रती छापून त्याचा एक समांतर साहित्यिक व्यवहार जोपासणारे. तिथून मग तो गुन्हेगारी, तुरुंगवासाच्या मार्गाने वाहत जातो. तिथे त्याला जाणीव होते त्या दुसऱ्या देर्दाची, जी इस्तंबूलच्या परिघावरच्या एका खेड्यामधे, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या परिसरात अनाथ जगत असताना अल्पवयात निकाहनामा होऊन लंडनला जाते आणि तिथे पुढची दहा वर्षे नजरकैदेत जगते. एक बंद फ्लॅट हेच तिचे आयुष्य. समांतर जगणाऱ्या या दोन देर्दांची विश्वे एकमेकांना छेदून जाईपर्यंतचा प्रवास आणि नंतरचे त्याचे एकत्रित आयुष्य जितके वास्तव तितकाच त्यांचा हा प्रवास अद्भुत आणि मानवतेच्या मूलभूत भावनांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारा.