Ek Swapna Punha Punha | एक स्वप्न पुन्हा पुन्हा

Ek Swapna Punha Punha | एक स्वप्न पुन्हा पुन्हा
गुलजारांचा एकूणच जीवनविषयक दृष्टीकोन विधायक स्वरूपाचा आहे. जीवनातील दु:खद अनुभवांचा धारदार परिचय करून देतानाच ते जीवनातील उजळ बाजूचेही दर्शन घडवितात. तसेच गूढांतील रहस्य अलवारपणे तरल हाताने उकलून दाखवतात.अशाच त्यांच्या तरल आणि आत्मस्पर्शी निवडक कवितांचा मराठी अनुवाद विजय पाडळकर यांनी मराठीतून केला आहे. कवी म्हणून गुलजार मोठेच आहेत पण व्यक्ती म्हणूनही ते मोठे आहेत. विजय पाडळकर, किशोर कदम यांच्याशी जुळलेल्या मैत्रीच्या नात्यातून 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' या सुंदरशा संग्रहाची निर्मिती झाली.या संग्रहात 'त्रिवेणी' हा वेगळा काव्यप्रकार रसिकांसाठी खास भेट ठरणारा आहे. त्रिवेणी हा हायकूशी नाते सांगणारा काव्यप्रकार गुलजारांनी समर्थपणे हाताळला आहे. तीन ओळींच्या ह्या लहानलहन रांगोळ्या काढताना त्यांच्यामधील सौंदर्यप्रेमी रोमॅंटिक कवी रंगून जातो. इथे जे सांगायचे आहे ते अतिशय थोड्या शब्दांत व परिणामकारकपणे आले पाहिजे. दोन ओळींत एक कल्पना मांडायची आणि तिसऱ्या ओळीत तिला एक वेगळीच दिशा द्यायची अशी रचना करताना गुलजारांच्या प्रतिभेला नवे पंख फुटतात. त्यांची शब्दांवरची हुकूमत आणि कल्पनेच्या भराऱ्या यांचे विस्मयकारक दर्शन या त्रिवेणीत घडते.