Gas Chamber | गॅस चेंबर

Gas Chamber | गॅस चेंबर
रत्नाकर मतकरी यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेल्या ‘गॅस चेंबर’ या नवीन कथासंग्रहातील कथांमध्ये मृत्यूचे सावट, राजकीय-सामाजिक दडपशाही, नागरिकांवर पाळत ठेवणारी (सर्वेलन्स) सरकारे व खाजगी कंपन्या, अशा बऱ्याचशा गडद संकल्पनांचे अस्तित्व आहे. या कथासंग्रहातील जवळपास सर्वच कथा या ‘डिस्टोपियन’ (जेथील सर्व गोष्टी अत्यंत वाईट असतात अशी एक काल्पनिक जागा) म्हणाव्यात, अशा आहेत. त्या ज्या काळात घडतात, तो काळ काही एक प्रमाणात पुढेमागे होत असला तरीही प्रत्येक कथेतील विश्वनिर्मिती आणि कथेत घडणाऱ्या गडद छटा असणाऱ्या घटना या डिस्टोपियाकडे सूचना करणाऱ्या आहेत. ज्यात नजीकच्या भविष्यकाळातील गडद कथानके पाहायला मिळतात. "‘गॅस चेंबर’ ही शीर्षक कथा ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ आणि ‘ना बजेगी बाँसुरी’ या कथांमध्ये काही समान धागे आहेत. या कथा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक दडपशाही असणाऱ्या काळात घडतात. आणि अशा अस्थिर काळात साहित्य आणि वृत्तपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असते. राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या सत्ताकेंद्रांना आणि सर्वशक्तिमान व्यक्तींना साहित्य वृत्तपत्रे यांसारख्या माध्यमांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे वाटते. या कथा साधारणतः अशाच वातावरणात घडतात."