Ghashiram Kotwal |घाशीराम कोतवाल

Ghashiram Kotwal |घाशीराम कोतवाल
पेशवाईच्या उत्तरार्धात नाना फडणवीसांच्या कारकिर्दीत घाशीराम कोतवाल नावाच्या व्यक्तीने सत्तेच्या आकांक्षेने घातलेल्या धुमाकूळाची आख्यायिका केंद्रस्थानी ठेवून विजय तेंडूलकरांनी या नाटकातून तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय अध:पतनावर व महाराष्ट्राच्या एकेकाळच्या र्हासशील संस्कृतीवर गर्भित पण प्रखर असे भाष्य केले आहे.सत्ताधारी व सत्ताकांक्षी यांच्यातील स्वार्थी वृत्ती, त्यापायी कोणाचाही बळी देताना मुलाहिजा न बाळगण्याचा त्यांचा बेगुमानपणा, रंगेल, विलासी व सत्तेचा वापर करणाऱ्या माणसांमुळे होणारे समाजाचे, कुटुंबव्यवस्थेचे अध:पतन, स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती, माणसांमधील विषयासक्ती, नीतिबधीरता, सूडबुध्दी, मद इत्यादी प्रवृत्ती अशा अनेक अंत:प्रवाहांमुळे या नाटकाला वेगळे असे वैचारिक परिमाणही मिळाले आहे. उत्तर पेशवाईतील सांस्कृतिक र्हासाचे व नैतिक अध:पतनाचे चित्रण करताना नाना फडणवीस व तत्कालीन ब्राम्हणांची लोलुपता, भिक्षुकीवृत्ती, रंगेलपणाही तेंडूलकरांनी अधोरेखित केली. त्यामुळे 'घाशीराम कोतवाल' हे नाटक तेंडूलकरांच्या नाट्य-कारकिर्दीतले एक खळबळजनक, अपूर्व आणि प्रक्षोभक असे नाटक ठरले.