Installations | इन्स्टॉलेशन्स

Installations | इन्स्टॉलेशन्स
'इंस्टॉलेशन्स’ या संग्रहातील गणेश मतकरींची कथा ही आजच्या नागर जीवनवास्तवाचे चित्रण करणारी कथा आहे. ती आजच्या, अलीकडच्या, हा वर्तमान घडवणाऱ्या नजीकच्या भूतकाळातल्या मुंबईची आणि अर्थातच मुंबईकरांची कहाणी आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, पाचपेच हा या कथेचा पोत आहे. तिच्यातील अनुभव घेण्याची पद्धत, तिची बोली, ही आजची, आत्ताची आहे. ही समकालीनता हा तिचा एक अविभाज्य घटक आहे. या कथेचा विशिष्ट स्वाद त्यातूनच घडलेला आहे.असे असले तरी मतकरींची कथा ही समकालीनतेने कुंठीत झालेली नाही. मूलभूत मानवी वृत्तीप्रवृत्ती, कालगतीने, परिस्थितिवशात या आंतरिक वास्तवात आणि ते घडवणाऱ्या भौतिक, सांस्कृतिक अवकाशात अटळपणे येणाऱ्या नवनव्या वळणवाटा यांचा वेध, हे या कथेचे लक्ष्य आहे.