Jagran | जागरण
Jagran | जागरण
बालक जन्माला आल्याबरोबर त्याला सर्व काही येत नाही. त्याला कुठलीही भाषा येत नाही. कुठलाही संबोध अनोळखी असतो, अज्ञान असते. परंतु जेव्हा त्याचे डोळे व आपले डोळे एकमेकांकडे बघतात तेव्हा आपली अपेक्षा व बालकाची दृष्टी यात काहीतरी समझोता होतो. आपण हसण्याची कृती करतो, बाळही हसते, अगर रडते. त्यातून निर्माण होणारा ध्वनी आपण ऐकतो. त्यापासून अर्थ लावतो. अगर आपण त्याला त्या क्षणापर्यंत काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या तोंडातून काही एक अवयव असणारे शब्द, दोन अक्षराचे शब्द, अगर नुसता आवाज म्हणजे ध्वनी निर्माण करतो. त्यातूनच स्वरनिर्मिती होते. ते स्वर बालकाच्या कानावर पडतात. बालक ऐकते त्याचबरोबर आपले ओठ काही आकार घेतात. बालक ते बघते व त्यानुसार तोंडाचा आकार करायचा प्रयत्न करते. हळूहळू अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, औ. अं, अः या प्रकारची स्वरनिर्मिती आपल्याबरोबर शिकते. म्हणजेच आपण कुठली भाषा त्याला शिकवतो हे त्याला माहीत नसते. ज्या प्रकारची मायबोली असते, त्या कुटुंबानुसार ते स्वर तयार करायचा प्रयत्न करते. नंतर शब्द ऐकते तेही दररोज क्षणाक्षणाला शेकडो वेळेस. आपण ह्या शब्दांचा उच्चार करतो. आपल्या शरीराची हालचाल करतो. त्यानुसार ते प्रथम स्वर कानांनी ऐकतो, डोळ्यांनी बघतो. हात, नाक, तोंड, डोळे यांचे निरीक्षण होते. आणि त्या प्रकारचा आवाज अगर कृती तयार होते. आपल्याला बालकाच्या अक्षरांचा अगर शब्दांचा आनंद होतो. बाळ आपल्या शब्द व शारीरिक हालचालीनुसार सकारात्मक प्रतिक्रिया देते. म्हणजेच शिकविण्याचा व शिकण्याचा प्रयत्न घडतो.