Kahitari Navin | काहीतरी नविन

Kahitari Navin | काहीतरी नविन
नावाला साजेशी त्याची शैली आहे. सामान्यातलं असामान्यत्व आणि असामान्यातलं सामान्यत्व तो अचूक टिपतो. लिखाणात कसलाही आव नाही,अभिनिवेश नाही. ओघवत्या लेखनशैलीमुळे एकेका लेखाबरोबर त्याची आपल्याला ओळख पटते, जीवाभावाचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. तो जुन्याचा उदोउदो करत नाही,मात्र नाविन्याचे कौतुक करताना ‘दृष्ट काढायला विसरत नाही. । त्याच्या लेखातून भेटणारा-भिडणारा तो आपल्यातलाच' आहे. चुकांचं भान असणारा,आशावाद जपणारा,उद्याची स्वप्ने पाहणारा.. मात्र तो जे सांगतो, ते उपदेशकाच्या 'हुकूमी' आवाजात नाही तर मित्राशी हितगुज करावं तसं. तो सांगतोय ते ऐकताना कुठेतरी 'आपुलाची वाद आपणासी' असा अनुभव येतो. । या लेखांतून अनेक विषय ओघाने येतात. परस्पर नातेसंबंध, प्रेम, सौंदर्य, निसर्ग, मृत्यू, मैत्री, संगीत, काव्य, सामाजिक भान... कधी तुम्ही अस्वस्थ व्हाल, कधी गहिवराल, कधी गालातल्या गालात हसाल तर कधी कुणीतरी तुमच्याच टपलीत मारल्याचा भास होईल. वाचनात तुम्हाला आनंद मिळत असेल, तर .. हे पुस्तक म्हणजे तुमच्या हाती लागलेलं आनंदाचं घबाड आहे.