Kalokhachi Pise | काळोखाचीं पिसें

Kalokhachi Pise | काळोखाचीं पिसें
जीवनातील दुःख, दारिद्र्य, मरण हे जरी रेगे यांच्या अखंड चिंतनाचे विषय असले तरी त्यांनी भयकथा, रहस्यकथा, हास्यकथा, रूपककथा, मनोविश्लेषणात्मक कथा यांसोबत लोकविलक्षण किंवा अलौकिक अनुभव देणाऱ्या कथाही लिहिल्या. नंतर ते कवी म्हणून गाजले, तरी सुरुवातीच्या त्या काळात ते कविता लिहीत नव्हते. तरीही त्यांच्या बहुतेक कथांत त्यांच्यातील कवी दडला होता. काही कथांतून आर्त मनोवस्थांचे ते उत्कट दर्शन घडवत. ह्या भाववृत्तींचे रंग त्यांच्या अंगोपांगामध्ये भिनलेले होते. त्यांच्या बहुढंगी कथासंभारातून प्रातिनिधिक स्वरूपाचा ‘काळोखाचीं पिसें’ असा हा संग्रह प्रा. वा. ल. कुळकर्णी यांच्या प्रस्तावनेसह १९५४ साली प्रसिद्ध झाला. प्रा. कुळकर्णी म्हणतात, ‘आजच्या मराठी लघुकथेला रंगदार व ढंगदार करण्याला ज्यांचे प्रयत्न विशेष करून कारण झाले आहेत त्यात सदानंद रेगे यांना मानाचे स्थान आहे. त्यांची प्रतिभा बहुप्रसवा आहे, प्रयोगक्षमता हा तिचा धर्म आहे, उत्साह तिच्या नसानसातून खेळतो आहे. त्यानंतरचे रेगे यांचे कथासंग्रह ‘चांदणे’, ‘चंद्र सावली कोरतो’, ‘मासा आणि इतर विलक्षण कथा’ यांचे आपापले वैशिष्ट्य असले तरी त्यांच्या कथालेखनाची विविध रूपे लक्षात घेण्यासाठी ह्या संग्रहाचे विशेष महत्त्व आहे.