Khol Khol Dushkal Dole | खोल खोल दुष्काळ डोळे

Khol Khol Dushkal Dole | खोल खोल दुष्काळ डोळे
एका संवेदनशील कवी मनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी ही कादंबरी आहे. स्थैर्य, सुरक्षितता न गवसलेल्या आणि बुड टेकण्याच्या धडपडीतल्या दिवसांच्या या जणू नोंदी आहेत. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग… 'एका झाडाची सवे न व्हावी : एका स्थानाची सवे न व्हावी :’ असा आहे. जगण्याच्या घुसळणीत शब्दांना सत्व बहाल करणाऱ्या तुकारामापासून ते आवाजात कारुण्य साकळलेल्या मुकुल शिवपुत्रापर्यंत अशा अनेक गोष्टी या नायकाला बळ पुरवणाऱ्या आहेत. वेढलेली परात्मता, दुःख, स्वार्थ, प्रेम, निराशा अशा विविध प्रवृत्तींचे प्रतिबिंब इथे दिसेल. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक, विस्कळीत वाटणाऱ्या उठाठेवी एका निर्णायक वळणावर चिंतनशीलतेचा टप्पा गाठतात आणि ठाव न गवसलेला हा प्रवासही अस्तित्वशोधाच्या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतो. व्यर्थतेतही अर्थपूर्णता शोधणारी 'खोल खोल दुष्काळ डोळे' ही प्रदीप कोकरे यांची कादंबरी म्हणजे आजच्या एका पिढीचा महत्त्वाचा प्रातिनिधिक स्वर आहे. - आसाराम लोमटे