Landmafiya | लँडमाफिया

Landmafiya | लँडमाफिया
मोठ्या शहरांचा विस्तार होऊ लागला तशी शहराभोवतीच्या गावाची स्थिती पालटू लागलेली दिसते. औद्योगीकरण आणि इतर कारणामुळे शहरांचा नकाशा झपाटाने बदलू लागला आणि छोटया गावांना देखील शहरांचा तोंडवळा प्राप्त झाला. जमिनी विकून छोटे शेतकरी मालामाल झाले. त्यापैकी फार थोडया लोकांनी नीट आथक गुंतवणूक केली. उर्वरित बहुसंख्य शेतकरी अचानक पैसा हातात पडल्यामुळे सैरभैर झाले. काही देशोधडीला लागले. पैसा सांभाळता न आल्याने कफल्लक झाले. आपल्याच शेतावर उभारलेल्या टॉवरमध्ये वॉचमन झाले. काही व्यसनाधीन तर काही गुंड, मवाली झाले.पैशाच्या जोरावर अर्धशिक्षित तरुण भाईगिरी करू लागले. सत्ताधार्यांच्या आश्रयाने पुढारी झाले. दंडेली करून पैसा मिळवणे, त्यातून जमीन खरेदी करणे, ती विकून पुन्हा पैसा कमवणे, सहजपणे जमीन खरेदी करता आली नाही तर पिस्तुलाचा धाक दाखवून हडप करणे असे दुष्टचक्र सुरू झाले आणि त्यातून समाजर्हासाची बीजं पेरली गेली. कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला. खेड्यातलं गावपण नाहीसं झालं. परस्परातील सामंजस्य आणि आस्था लयाला गेली. मानवी नातेसंबंध दुरावले आणि फक्त पैशाला किंमत प्राप्त झाली.पैशापुढे सगळेच फिके पडले. हे वर्तमानातील धगधगते समाजवास्तव बबन मिंडे या तरुण लेखकाने आपल्या लॅंडमाफिया या कादंबरीतून अधोरेखित केले आहे.