Narakatala Swarg | नरकातला स्वर्ग

Narakatala Swarg | नरकातला स्वर्ग
मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण – ‘नरकातला स्वर्ग.’ भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे.