Pais | पैस

Pais | पैस
गोदावरी आणि प्रवरा...या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या, अति साध्या गावात एक अद्भुत प्रतीक आहे. खांबाचे...खांब, तोही ओबडधोबड नि लहानखुरा... पण त्या खांबावरचा अदृश्य भाग एका समाधिस्थ जीवाला त्याच्या जीवनावधीतच भासमान झाला. तो भाग-चारी क्षितिजांना भेदून आरपार जाणारा, आकाशालाही उंच ओढून त्याच्या वर, थेट चैत्यन्याच्या बेंबीला भिडणारा भाग-त्या दोन डोळ्यांनी अक्षरश: पाहिला. त्याला त्या साक्षात्कारी युवकाने ‘पैस’ असे नाव दिले. अजूनही ज्ञानेश्वरी वाचा की त्या खांबाच्या वर पैसाचा पारदर्शक पसारा उभारलेला तुम्हांला दिसेल. म्हणून या खांबाचे माझे नाव ‘पैसाचा खांब’...यालाच टेकून ज्ञानोबाने पैसाची मर्यादा पाहिली, काल व अवकाश यांची सीमारेषा जोखली आणि मानवाच्या अंत:स्थ गहनतेची अमर्यादिता अनुभवली. खोली आणि उंची, रहस्य व खुलेपणा, गूढ व प्रांजळ, वेदना व सुख, मृत्यू आणि जीवन, भोळेपणा व ज्ञान यांतले ऐक्य टिपले...