Pankh Ani Panje | पंख आणि पंजे

Pankh Ani Panje | पंख आणि पंजे
लोकांच्या क्षमतांवर विश्वास असलेली ‘कोरो साक्षरता समिती’ 1989 पासून मुंबईमधील वस्त्यांमधून दलित, मुस्लीम समूहासोबत महिला सक्षमीकरण आणि वस्ती विकासाचे काम करते आहे. ‘कोरो’ने आपल्या कामाची सुरुवात प्रौढ साक्षरतेतून केली. यात सहभागी तरुण, महिला, पुरुष यांच्या जाणिवा जागृत केल्या. लोकांच्या प्रश्नांना लोकांनीच सामोरे जायला हवे, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. त्यामुळे ज्यांच्या समस्या होत्या तेच बाह्या सरसावून किंवा पदर खोचून पुढाकार घेण्यासाठी सरसावले असे दिसून येते. प्रत्यक्ष अनुभवांतून या मंडळींची समज वाढत गेली, विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या, सर्वच दृष्टींनी वंचित असलेल्या या लोकांनी त्यांच्यासारखे जीवन जगणाऱ्या लोकांना एकत्र करून स्वतःचा प्रश्न सामूहीकरीत्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एखाद्या समूहात बाहेरून बदल घडवू पाहणारी मंडळी अनेक वेळा निमित्त असतात. सुरुवात करून देणारे, प्रेरणा देणारेही अनेक असतात. पण शेवटी, ज्यांचे प्रश्न तेच खऱ्या अर्थाने ते सोडवू शकतात. ‘कोरो’चा गेल्या 25 वर्षांचा प्रवास पाहिल्यास ‘कोरो’; संघटना म्हणून कार्यक्रम म्हणून, कार्यपद्धती म्हणून उत्क्रांत होत गेलेली दिसते. आज ‘कोरो’ ही संघटना तळातील सामाजिक बदलांच्या सामूहिक प्रक्रिया घडवून आणण्यात मदत करणारी संघटना आहे. महिला सक्षमीकरण ते पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन (जंगल, नदीपात्र, गवताळ जमीन, मासेमारी इत्यादी), वंचित समूहांसोबत (मोंगिया समाज, कातकरी समूह, पारधी समूह, धीवर समाज, बसोड समूह इत्यादी) चं काम अशा विविध विषय आणि पातळ्यांवर नेतृत्वविकास कार्यक्रमांतर्गत ‘कोरो’ काम करीत आहे.