Purnamayachi Lekar | पूर्णामायची लेकरं

Purnamayachi Lekar | पूर्णामायची लेकरं
गो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी - पूर्णामायची लेकरं. वर्हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.