S. D. Barman Jivan Sangit | एस. डी. बर्मन जीवन संगीत

S. D. Barman Jivan Sangit | एस. डी. बर्मन जीवन संगीत
एच. क्यू. चौधरी यांनी लिहिलेल्या इन्कम्पेरेबल सचिन देव बर्मन या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. यात बर्मनदांविषयी चमचमीत, खळबळजनक वाचायला मिळणार नाही, परंतु त्यांच्या संगीताविषयी आतडाची माया असणार्यांनसाठी यात अनेक जिव्हाळ्याच्या जागा सापडतील. इतर संगीतकारांच्या तुलनेत बर्मनदांची कारकीर्द थोडी उशिरा- वयाच्या चाळिशीत सुरू झाली. त्यांना हा उशीर का झाला आणि आधीची सुमारे दोन दशके ते काय करत होते याबद्दल या चरित्रग्रंथात माहिती मिळते. बंगाली संगीतातील त्यांच्या कामगिरीविषयीही यात चांगली माहिती आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुमारे तीन दशकांची कारकीर्द, निरनिराळ्या गायक-गायिकांचा कौशल्याने वापर करण्याची त्यांची योजकता, लता मंगेशकरांशी झालेला काही काळाचा बेबनाव आणि तो मिटवण्यासाठी बर्मनदांनी स्वत:च घेतलेला पुढाकार, व्यक्ती म्हणून त्यांच्यात असलेले गुण-दोष यांसारख्या अनेक पैलूंची हे पुस्तक आपल्याला ओळख करून देते. लोकसंगीताशी नाते सांगणारे संगीत निर्माण केलेल्या या बुद्धिमान कलाकाराच्या जीवन व संगीताची प्रांजळपणे घडवून आणलेली ही सैर निश्चितच वाचनीय आहे.