Sakshi | साक्षी

Sakshi | साक्षी
एस. एल. भैरप्पा यांच्या साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी साक्षी. साक्षीचा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या साक्षी या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर साक्षी म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा साक्षीच्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी साक्षी.