Santapjanak Nibandh | संतापजनक निबंध

Santapjanak Nibandh | संतापजनक निबंध
प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे आपल्या देशातील एक विख्यात विद्वान होते. प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या कोसंबींनी गणित, सांख्यिकी, भारतविद्या, इतिहास, अशा विविध ज्ञानशाखांमध्ये मूलगामी योगदान दिलं. त्याचसोबत समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांवरही त्यांनी मर्मग्राही लेखन केलेलं आहे. एकंदरीत, भारतातील मार्क्सवादी विचाराच्या कक्षा रुंदावण्यात त्यांनी कळीची भूमिका बजावली. "विसाव्या शतकातील विज्ञान व तंत्रज्ञानाचं स्वरूप आणि त्याचे मानवतेवरील परिणाम यांचा गाभा जाणलेल्या मोजक्या महान भारतीय विचारकांमध्ये त्यांची गणना करावी लागते. विशेषतः अविकसित देशांच्या संदर्भात विज्ञान आणि सामाजिक प्रक्रिया यांच्यातील आंतरसंबंधांविषयी ते विलक्षण जागरूक होते. विज्ञान व त्याचं उपयोजन यांकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन केवळ तांत्रिक नव्हता तर एकात्मिक स्वरूपाचा होता. त्यांनी शांततावादी चळवळ आणि अण्वास्त्रविरोधी मोहिमेमध्येही दीर्घ काळ सहभाग घेतला." "प्रस्तुत पुस्तकामध्ये विविध विषयांवरचे निबंध आहेत. हे निबंध दुराग्रही बुद्धिजीवींना कदाचित संतापजनक वाटतील पण महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांची वैध उत्तरं शोधू पाहाणाऱ्यांच्या विचारप्रक्रियांना चालना देणं हा या लेखनामागचा मूळ उद्देश जाणवतो." "नेतृत्व आवश्यक असतं का? समूह पातळीवरचे सर्व बदल अपरिहार्य असतील तर व्यक्तीनं काहीच करायची गरज नाही का? स्वातंत्र्योत्तर भारतातील सत्ताधारी वर्गाचं स्वरूप कसं आहे? चीनमधील क्रांतीचं स्वरूप कसं होतं? विज्ञान आणि वैज्ञानिकांचं स्वातंत्र्य म्हणजे काय? ‘आतला आवाज’ नेहमी सुरक्षित मार्गदर्शन करतो का? सॉक्रेटीसच्या वादविवादपद्धतीचा तत्कालीन ग्रीक वर्गरचनेशी काय संबंध होता? दयाभावानं भारलेला बौद्ध धर्म आपल्या देशातून विरून का गेला? १८५७च्या उठावाचं महत्त्व काय होतं? संस्कृत साहित्य वर्गीय पूर्वग्रहापासून मुक्त आहे का? जागतिक शांततेच्या वाटेमधील अडथळे ठरणारे घटक दूर करता येतील का? – अशा विविध प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे आणि कोसंबी म्हणतात त्याप्रमाणे या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची आहे ती उत्तर शोधण्यासाठी वापरलेली ‘विरोधविकासी भौतिकतावाद ही पद्धती!"