Saransh Shunya | सारांश शून्य

Saransh Shunya | सारांश शून्य
‘सारांश शून्य’ही कादंबरी आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. एक वास्तववादी विषय प्रामाणिकपणे मांडण्याचे समाधान मला या निमित्ताने मिळाले. शिक्षणावर इतके काही लिहिले जाणे वाईट नाही; तरी त्यातील बहुतेक लेखन हे उपदेशपर, शिक्षण खूप वाईट आणि खूप चांगले अशा दोन्ही टोकांचे! म्हणजे कुणी सरकारी शाळा संपूर्ण बाद ठरवून त्या बंद करण्याचे नवनवे प्रयोग सुचवते, तर कुणी या शाळा व शिक्षक किती प्रयोगशील आहेत हे दाखवण्यासाठी पुराव्यानिशी पुस्तक लिहिते. नकोशा पुस्तकांची शिक्षक होळी करतात तर प्रतिमा उजवळणाऱ्या पुस्तकांचा सकारात्मक प्रचार करतात. अशी दोन्ही टोकांची पुस्तके वाचून समाज संभ्रमित होतो. खरेच सरकारी शाळा बंद करून त्या खाजगी कराव्यात का? मग गरिबांची मुले शिकतील कुठे? शिक्षक शिकवतच नाहीत तर बहुसंख्य कर्तबगार माणसे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती, हे कसे? गुणवत्ता घसरत चालली आहे असे मानले तर नेमके चुकतेय कोण... शिक्षक, पालक, पर्यवेक्षकीय यंत्रणा की सरकार? चांगले-वाईट या दोन्ही टोकांच्या मध्ये वास्तव मात्र झाकले जात आहे. याची डाचणी मनाला वारंवार जाणवत होती. मालिका, चित्रपटांतून शिक्षण व शिक्षकांचे विपर्यस्त चित्रण समाजापुढे येत होते, अजूनही येते. या जाणिवेतूनच या कादंबरीचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणात सद्यस्थितीत आहे ते वास्तव मांडायचे, चूक कोणाची, यावरचे उपाय व पर्याय, असे सारे निर्णय वाचकांवर सोपवायचे, म्हणूनच हा लेखनप्रपंच! - संजय कळमकर