Shabdapradhan Gayaki | शब्दप्रधान गायकी

Shabdapradhan Gayaki | शब्दप्रधान गायकी
गीत ही एका अर्थी सहकारी कला आहे. कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक असे क्रमाने येणारे तीन घटक ही कलाकृती पूर्ण करतात. एकटा संगीत-दिग्दर्शक किंवा एकटा गायक धून निर्माण करू शकेल; पण गीत निर्माण करू शकणार नाही. या तिघांत अधिक महत्त्वाचा कोण, हा प्रश्न अर्थशून्य आहे. यांतला प्रत्येक घटक आपापल्या परीने तितकाच महत्त्वाचा आहे. संगीत-दिग्दर्शक नसेल तर कवीची रचना केवळ शब्दरूप उरेल, गायक नसेल तर संगीतकाराने या शब्दांतून निर्माण केलेली स्वरांची बंदिश संवेदनेच्या कक्षेतच येणार नाही. या तिघांच्या प्रतिभा एकत्र येतील तेव्हाच गीताची प्राणधारणा होऊ शकेल. गीत निर्माण होऊ शकेल. यशवंत देव यांच्यात या तीनही प्रतिभांचा संगम होता. ते कवी होते, संगीतकार होते आणि गायकही होते. त्यामुळेच शब्दप्रधान गायकीविषयी त्यांनी केलेले लेखन हे जास्त महत्त्वाचे ठरते. ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकात देव यांनी भावगीत गायन कसे असावे, गाताना कोणकोणत्या गोष्टींचे व्यवधान बाळगले पाहिजे, गेय कवितेची वैशिष्ट्ये, कवितेला चाल लावताना किंवा संगीत-दिग्दर्शन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी या विषयांची चर्चा केली आहे. सुगम संगीतावर असे पद्धतशीर लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे पहिलेच पुस्तक संगीताचे विद्यार्थी, रसिक, अभ्यासक यांना उपयुक्त होणारे आहे.