Shilan Adhik Ath Katha | शिळान अधिक आठ कथा

Shilan Adhik Ath Katha | शिळान अधिक आठ कथा
उद्धव ज. शेळके समाजाच्या खालच्या थरांतील जीवनाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहतात. त्यांच्या दृष्टीत गाढ सहानुभूती असते. परंतु तिच्यावर भावनांचं धुकं नसतं. त्यांची दृष्टी स्वच्छ अन् भेदक असते. अनुभवाच्या सर्व अंगांना आश्लेषावं ही तिची मनीषा असते. त्यांची संवदेनप्रधान भाषा संवादाच्या एकाद्या तुकड्यातून फार काही सुचवून जाते. शेळके यांच्या पात्रांना दुःखं सोसण्याची सवयच असते. त्यांची ही दुःख कधी सामाजिक तर कधी आर्थिक असतात.डोहाच्या तळातून उष्ण झरे निघत असता वरून जसा तो गंभीर, गूढ व शांत दिसतो, तशी शेळके यांची पात्रे शांत राहतात. ती आपली दुःखं शरीराचा एखादा अवयव समजून वाहत असतात. म्हणून प्रा. अ. ना. देशपांडे ‘शिळान’ बद्दल लिहितात, “शेळके यांच्या या संग्रहाचं सर्वांत श्रेष्ठ व गौरवार्ह वैशिष्ट्य निराळंच आहे. कोणत्याही मर्यादित जीवनदृष्टीचा स्वीकार न करता मूलभूत व सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावनांचे, त्यांच्या विविध विलसितांचे जिवंत व साक्षात्कारी चित्रण करण्यातील लेखकाची, वस्तुनिष्ठ, व्यापक व अस्सल मानवतावादी कलादृष्टी हे ते वैशिष्ट्य आहे.’ त्यामुळे ‘शिळान अधिक आठ कथा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण Filters ठरला आहे.