Shriman Prasanna | श्रीमन प्रसन्न

Shriman Prasanna | श्रीमन प्रसन्न
श्रीमन प्रसन्न असे वाचल्यावर मन ही एक देवता आहे असे लक्षात येते. आरोग्य, पैसे, मुले-बाळे, प्रसिद्धी या मनुष्याच्या आवश्यकता वेगवेगळ्या देवतांच्या आशीर्वादाने मिळतात, अशी कल्पना असली तरी हे सर्व मिळाल्यानंतर त्यापासून मिळणारा आनंद, त्यापासून होणारे सुख किंवा जे मिळविले, ते पचवण्याची ताकद देणारी देवता म्हणजे मन. मनाला समाधान नसले, मनुष्य सारखा दुःखी राहत असला, त्याला खाली मान घालून एकांतात व अंधारात बसावेसे वाटत असले तर स्वतःच्या मोठ्या हवेलीबाहेर असलेल्या गाड्या-घोडे अशा संपदेचा, बॅंकेत असलेल्या अफाट संपत्तीचा, आरोग्य लाभले असल्याचा, बायको-मुले वगैरे सर्व व्यवस्थित असल्याचा काय उपयोग? त्यामुळे समाधानी मन ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे, म्हणून या पुस्तकाला "श्रीमन प्रसन्न' असे शीर्षक निवडले.मनाच्या श्लोकांबाबत झालेले चिंतन, प्रत्यक्ष असलेले अनुभव, इतरांना मार्गदर्शन करताना घेतलेल्या निर्णयांमुळे आलेले अनुभव हे सर्व लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक खरोखरच सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री वाटते.