Speedpost | स्पीडपोस्ट

Speedpost | स्पीडपोस्ट
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम..शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला ! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे. हादरे आणि आव्हानही दिलं आहे. "आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी ! गोंधळून टाकणार्या जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे.कुटुंबाची चौकट परस्परांमधल्या नात्यांचे बंध कौटुंबिक संस्कृती परंपरा आणि नीतीमूल्यांचा आग्रह कठोर शिस्त आणि सारंच झुगारून देणारी बंडखोरी...तासन् तास चालणारे टेलिफोन कॉल्स आणि लठ्ठ बिलांवरून घरात होणार्या हाणामार्या मध्यरात्रीपर्यंत चालणार्या पार्ट्या आणि इंटरनेटवरचं चॅटींग." "वयात येतानाच्या काळज्या कोवळ्या वयातलं प्रेम झपाटून टाकणारं शारीरिक आकर्षण आणि मैत्रीची नाजुक गुंतागुंत जोडीदाराची निवड आणि शारीरिक संबंधांचा तिढा ! देश...देव...धर्म... सामाजिक जबाबदार्या आणि नागरिकत्वाचं भान!" "अपरंपार प्रेमाने ओथंबलेली मायेने जवळ घेणारी कधी पाठीत धपाटे घालणारी चिडवणारी टिंगल करणारी तर कधी धारेवर धरणारी मनसोक्त हसवणारी आणि हसता हसता अचानक डोळ्यात पाणी उभं करणारी ही सुंदर पत्रं... 'जगण्या'साठी आसुसलेल्या प्रत्येक मनाला स्पर्शून जातील."