Thank You Mr. Glad | थँक यु मिस्टर ग्लाड

Thank You Mr. Glad | थँक यु मिस्टर ग्लाड
थँक यू मिस्टर ग्लाड ही अनिल बर्व्यांची कादंबरी म्हणजे अस्सलाचा वेध घेणाऱ्या कलाकृतीने प्रत्यही वितळणाऱ्या वास्तव द्रव्यावर उमटवलेला एक संस्मरणीय ठसा आहे. हिच्या अपयशाची मीमांसा तिच्या यशाच्या कीर्तनापेक्षा वाङ्मयीनदृष्ट्या अधिक मोलाची आहे. पण सुरुवातीला तिच्या निर्मितीतील यशाचा भागही लक्षात घ्यायला हवा. वर वर पाहता या जेमतेम शंभर पानांच्या कादंबरीचे कथानक अगदी साधे आहे. त्यात म्हणजे कथानकात लेखकाला स्फूर्ती देणारे असे काहीच नाही. राजमहेंद्री जेलमध्ये आलेल्या एका नक्षलवाद्याच्या आयुष्यातले शेवटचे काही दिवस, उणेपुरे एक वर्ष, हा तिच्या कथानकाचा आधार. "साधी सरळ कथा. पण कादंबरीवाचनाचा अनुभव मात्र आपल्याला असे एकसुरी एकपदरी कथानक देत नाही. खरे तर हा अनुभव आपल्या डोळ्यांसमोर कथानकाच्या रूपरेखेच्या स्वरूपात येतच नाही. तो अनुभव असतो हृदय हलवून सोडणाऱ्या आणि चित्तवृत्ती मोहरवून टाकणाऱ्या एका उदात्त मानस-परिवर्तनाचा एका दुर्मीळ अमोल उन्नयनाचा माणुसकीच्या fellow feelingच्या जन्माचा. अनिल बर्व्यांची ही कादंबरी माणुसकीचा जन्मोत्सव साजरा करते मानवी कणवेच्या आणि करुणेच्या अंतिम विजयाची कुंकमपताका ती फडकावते. ही विजयपताका लहान असली तरी अस्सल आहे तिचे पोत घट्ट वाणीचे आहेत आणि असे करताना बर्व्यांची कादंबरी या मार्गावर इतरत्र आढळणारे प्रचारकीपणाचे अनेक धोके सहजपणे टाळते."