Uchalya | उचल्या

Uchalya | उचल्या
भटक्या विमुक्तांवरील अन्यायाला वाचा फोडणारी चरित्रात्मक कादंबरी. या आत्मकथनात एक प्रसंग आहे. स्वत: लक्ष्मण गायकवाड शाळेत जायला लागले तेव्हा त्यांच्या वस्तीतल्या काही मुलांना खरूज आली. त्यावर जात पंचायत भरली. उचल्या हा त्यांचा समाज. या पंचायतीमध्ये वस्तीतल्या मुलांना खरूज का होत आहे, यावर बरीच चर्चा झाली आणि लक्ष्मण शाळेत जायला लागला त्यामुळे मुलांना खरूज होत आहे अशा निष्कर्षाप्रत या जात पंचायतीतले जाणते लोक आले. त्यांनी आपल्या वस्तीवरचे हे अरिष्ट टाळण्यासाठी लक्ष्मणला शाळेतून काढावे, असा आदेश लक्ष्मणच्या आई-वडिलांना दिला. आपल्या जातीमध्ये कुणीही शिक्षण घेऊ नये असा धर्माचा आदेश आहे. पण तो आदेश न जुमानता लक्ष्मण शाळेत जात आहे. त्यामुळे आज केवळ खरूज आली उद्या यापेक्षा मोठे संकट येऊ शकते, असा धाक जात पंचायतीने लक्ष्मणच्या आई-वडिलांना घातला. शेवटी त्यांची समजूत घालण्यात आली, त्यामुळे लक्ष्मणचे शिक्षण होऊ शकले. परंतु भारतातल्या विविध जात पंचायती कसे निर्णय देत असतात याचा हा एक ज्वलंत नमुना आहे.