Vatevarche Gaon | वाटेवरचे गाव

Vatevarche Gaon | वाटेवरचे गाव
शालेय वयापासून सिनेमा, प्रवासवर्णने, कादंबऱ्या.. आदीतून पॅरीसचे बरेवाईट चित्र डोळ्यासमोर होते. कधीकाळी हे शहर पहायला मिळावे हे स्वप्न माझ्याही डोळ्यासमोर होते. १९९६ साली पहिला प्रवासी म्हणून अन नंतर २०१० पासून दरवर्षी दोन तीन महिन्यांसाठी माझा इथे मुक्काम झाला. बेळगाव सोडले तर या शहरात मी एकटी भटकले आहे तेवढे कोणते शहर पायाखाली घातलेले मला आठवत नाही. या पुस्तकात आजवर केलेल्या भटकंतीत मला भावलेले पॅरीस तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. बारीक सारीक अक्कलखाती जमा केलेले अनुभव सोडले तर इथे मला दुखापत करणारे फारसे वाट्याला आले नाही. उलट या शहराने मला स्वतःत रमायला शिकवले. भाषा आली नाही तरी भटकंतीचा आनंद घेता येतो याचा अनुभव दिला, माणूस म्हणून अधिक समृद्ध केले, त्यामुळे एका अर्थाने हे सारे लिहुन मी या शहराच्या ऋणातून मुक्त होते आहे.