Yadonki Mahfi |यादोंकी महफिल

Yadonki Mahfi |यादोंकी महफिल
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकी प्रवासात सिनेमांतून होणाऱ्या मनोरंजनात काळानुसार बरेच बदल होत गेले; तसेच बदल झाले ते सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत. गेल्या काही वर्षांपर्यंत सिनेमे हे केवळ चित्रपटगृहांतच पाहण्याची सोय होती, आता कोणताही सिनेमा कधीही यू टय़ूबवर पाहता येतो. त्यामुळेच पूर्वी रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव या शब्दांना महत्त्व होतं. भक्तगण ज्या भावनेने मंदिराची पायरी चढतात, त्याच ओढीने चित्रपटगृहांच्या वाऱ्या करणारी रसिक मंडळी होती. अशाच सिनेमावेडय़ांपैकी एक म्हणजे लेखक सदानंद गोखले. उमेदीच्या दिवसांत गोखले यांनी वर्षांकाठी पाहिलेल्या शेकडो सिनेमांचं संचित म्हणजे त्यांचं हे पुस्तक. त्यांच्या सिनेमावेडाचं पुरेपूर प्रतिबिंब या पुस्तकात उमटलं आहे. हे सिनेमावेड केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून सिनेमातील विविध घटकांचा अभ्यास, चिंतन गोखले यांनी केल्याचं या पुस्तकाच्या पानोपानी जाणवतं. त्यामुळेच हे पुस्तक रंजकतेसह माहितीपूर्णही झालं आहे