Zuluk | झुळूक

Zuluk | झुळूक
या पुस्तकातले बहुतेक लेख 'स्त्री' मासिकामध्ये 'झुळूक' नावाच्या सदरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. इतरत्र प्रसिद्ध झालेले दोन लेख, 'झुळूक'च्या अंगाने जाणारे होते म्हणून समाविष्ट केलेले आहेत. 'स्त्री' सारख्या गंभीर, वैचारिक प्रवृत्तीच्या मासिकामध्ये 'झुळूक' सारखं छोटं, खेळकर सदर मी लिहू लागले तेव्हा मासिकाच्या संपादनात माझा थोडा सहभाग होता. विचाराला खाद्य पुरवणार्या लेखनाबरोबरच थोडा हलकाफुलका मजकूरही अंकामध्ये असावा अशी वाचकांची मागणी होती, संपादक वर्गालाही ती तत्वत: मान्य होती. पण सातत्याने चांगला बुद्धीगामी विनोद लिहिणार्या व्यक्ती सहजासहजी आढळत नव्हत्या. तेव्हा जवळजवळ प्रायोगिक पातळीवरच मी हे लिखाण सुरू केलं. सुरूवातींच्या 'झुळूकां'मध्ये माझं हे चाचपडणं स्वच्छ दिसतच आहे. पुढे मला हळूहळू सूर सापडू लागला असावा. त्यापूर्वी मी रूढ अर्थाने विनोदी लेखन केलेलं नव्हतं. विनोदी वाचन मात्र खूपच केलेलं होतं. चिं. वि. जोशी आणि पु. ल. देशपांडे यांचा माझ्या वाचनवयावर आत्यंतिक प्रभाव होता. या दोन थोर लेखकांच्या विनोदाच्या पुसट खुणा जरी वाचकांना 'झुळूक'मध्ये आढळल्या तरी मला धन्य वाटेल.